वृत्तसंस्था, नवी दिल्ली: रिलायन्स इंडस्ट्रीजचे सर्वेसर्वा मुकेश अंबानी यांनी सोमवारी आपले वारसदार घोषित केले. रिलायन्स इंडस्ट्रीजच्या ४५व्या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये त्यांनी ही घोषणा केली. आकाश, ईशा आणि अनंत या तिन्ही मुलांकडे स्वतंत्र जबाबदाऱ्या दिल्याचे अंबानी यांनी यावेळी सांगितले. त्याचवेळी अद्याप आपण निवृत्त झालेलो नाही, हेदेखील त्यांनी स्पष्ट केले.
वार्षिक सर्वसाधारण सभेत ६५ वर्षीय मुकेश अंबानी यांनी अनेक महत्त्वाच्या घोषणा केल्या. त्यामुळे रिलायन्स उद्योग एका विशाल कुटुंबाप्रमाणे एकत्र राहील, असा विश्वास अंबानी यांनी व्यक्त केला. रिलायन्सचे तेल शुद्धीकरण व पेट्रोरसायने, रिटेल आणि डिजिटल सेवा हे मुख्य व्यवसाय आहेत. डिजिटल सेवा व्यवसायातच दूरसंचार सेवेचाही समावेश आहे. यापैकी रिटेल व्यवसायासाठी रिलायन्स रिटेल व्हेन्चर लिमिटेड तसेच दूरसंचार व्यवसायासाठी जिओ प्लॅटफॉर्म्स अशा दोन उपकंपन्या कार्यरत आहेत.